E - Pass News Update

यमाई आणि जवळचे मंदिर

Yamai devi temple

यमाई मंदिर

floral

मूळ माया यमाई देवीच्या पदस्पर्शाने जोतिबा परिसर पावन झाला असून पूर्वी दक्षिण मोहिमेत केदारनाथ व औंदासुर राक्षसाची समोरासमोर भेट झाली . त्यांचे निकराचे युद्ध झाले, परंतु औंदासुराचा वध यमाई देवीच्या हस्ते असल्याने केदारनाथाने तिला यमाई अशी साद घातली तेव्हा तिचे नाव यमाई असे रूढ झाले, अशी आख्यायिका आहे. श्री यमाई देवीने औंदासुराचा वाढ करून केदारनाथांचा दक्षिणेकडील मार्ग निष्कलंक केला. हे सर्व सातारा जिल्ह्यातील औंध या गावी घडले. औंधच्या कंठगिरी या डोंगरावर मूळ माया यमाईदेवी औंधासुराचा निःपात करण्यासाठी या ठिकाणी प्रगट झाली म्हणून या कंठगिरीचे नाव मूळगिरी झाले. केदारनाथांची दक्षिण मोहीम पार पडल्यानंतर ते परत हिमालयाकडे जाण्यास निघाले. त्यावेळी महालक्ष्मीने विनवणी करून वाडी रत्नागिरी डोंगरावर गादी स्थापन करून त्यांचा राज्याभिषेक केला. या सोहळ्यास महालक्ष्मी यमाई देवीस बोलविण्यास विसरल्या. याची जाणीव चोपडाई देवीने केदारनाथांना करून दिली . तेव्हा केदारनाथांनी यमाई देवीचा रुसवा काढला. काही वर्ष उलटल्यानंतर यमाई देवीस वाईट वाटले. त्या केदारनाथांना म्हणाल्या, तुम्ही आता औंधकडे येऊ नका, मीच वाडी रत्नागिरी येथे चाफे वनात प्रकट होईन. त्याप्रमाणे यमाईदेवी चैत्र महिन्यात वसंत ऋतूत या डोंगरावरील उत्तरेकडील चंपक वनात प्रकट झाल्या. पुढे केदारनाथ चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या यात्रेत नित्याप्रमाणे लवाजम्यासह यमाईदेवीस भेटण्यास गेले. कृत युगात जमदग्नीच्या हातून रेणुका देवीचा वाढ झाला. त्यावेळी जमदग्नीने पूर्ण ब्र्हम सनातन ज्योतिस्वरुपाकडे रेणुका व आपले मीलन घडवण्याची इच्छा वरतून मागितली होती. ते नाथांना आठवून आपल्या स्वरूपातील जमदग्नीस वेगळा करून त्या जमदग्नीचा व पूर्वजन्मीची रेणुका म्हणजे श्री यमाई देवी या दोघांचा विवाह नाथांनी लावला. याप्रकारे जमदग्नी व यमाईचे पुनर्मीलन घडवून आणले. चैत्र यात्रेदिवशी सासनकाठी व पालखी सोहळा मिरवणूक सर्व लवाजम्यासह यमाई देवीच्या भेटीस जाते.

बाहेरील मंदिरे

floral
Datta mandir

रामेश्वर मंदिर

जोतिबा मंदिराच्या पश्चिम बाजूस रामेश्वर मंदिर आहे. या मंदिरासमोरील सदरेवर श्रींची पालखी बसते. रामेश्वर (रामलिंग) मंदिर हे इ. स. १७८० मध्ये मालजी निकम पन्हाळकर यांनी बांधले आहे.

श्री दत्त मंदिर

ब्रम्हा, विष्णू आणि महेश असा त्रिगुणी अवतार असलेल्या बालावधूत श्री दत्तांच्या पादुका या मंदिर परिसरात आहेत. श्री दत्तगुरु केदारनाथांच्या दर्शनासाठी आले व या ठिकाणी राहण्याची इच्छा प्रगट केली. त्याप्रमाणे मंदिरातील दक्षिणेकडील बाजूस औदुंबराच्या झाडाखाली त्यांनी वास्तव्य केले. याच ठिकाणी ग्वाल्हेरच्या सिंदिया ट्रस्टने दत्ताचे अति सुंदर मंदिर बांधलेले आहे.

kamdhenu Gai

जोतिबावरील बारा जोतिर्लिंगे

floral

१. बद्रिकेदार

( महादेव मंदिर- जोतिबा )

मूळ ठिकाण: केदारनाथ - हिमालय

केदारनाथांच्या अवतारकार्य समाप्तीनंतर यथासांग त्यांचा राज्याभिषेक झाला. त्यानंतर श्री केदारनाथांनी मंदिराच्या आवारामध्ये आपले अष्टप्रधान (अष्टभैरव ) यांची स्थापना केली. त्याचबरोबर हिमालयातील मूळ प्रकट स्थानाच्या स्मरणार्थ कालभैरव यांच्या हस्ते बद्रिकेदार या लिंगाची स्थापना करून त्यांची सर्व देवदेवतांच्या उपस्थितीत विधिवत षोडशोपचार पूजा केली. या लिंगाचे वैशिष्ट्य असे आहे की, ते पूर्वाभिमुख आहे.

२. काशी विश्वनाथ

( महादेव मंदिर - जोतिबा )

मूळ ठिकाण: विश्वेश्वर - वाराणसी

केदारनाथांचा सेनापती श्री कालभैरव यांचे मूळ ठिकाण म्हणजे वाराणसी (काशी) होय. काशी या क्षेत्राचे स्मरण व्हावे म्हणून काशी क्षेत्राचे मुख्य दैवत काशी विश्वनाथ यांचे स्मरण म्हणून या लिंगाची स्थापना केलेली आहे. काशी विश्वनाथ या लिंगाची स्थापना स्वतः कालभैरवांनी केली असून हे लिंग पूर्वाभिमुख आहे. याचे वैशिष्ट्य असे की, या लिंगासमोर नंदी नाही. या मंदिरात अनेक वैशिष्ट्ये पाहावयास मिळतील.

३. सेतुबंध रामेश्वर

( जोतिबा परिसरातील रामलिंग मंदिर )

मूळ ठिकाण: तामिळनाडू

श्री केदारनाथांचा परमभक्त गोमाजी सावंताने केदारनाथांकडे चारीधाम यात्रा तसेच बारा जोतिर्लिंगांचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी या लिंगाची स्थापना करताना राम अवताराचे स्मरण व केवटला दिलेले अभिवचन याप्रमाणे केदारनाथांनी सेतूबंध रामेश्वराची स्थापना केली. या मंदिराच्या आवारात जिथे केदारनाथाची पालखी सदरेवर बसते त्या सदरेच्या पाठीमागील बाजूस या रामलिंगाची (रामेश्वराची) स्थापना केली.

४. ओंकारममलेश्वर

( केखले गणेश बाग )

मूळ ठिकाण: विद्यांचल - मध्य प्रदेश

गणेश मंदिराच्या नैऋत्य बाजूस या लिंगाची स्थापना केली आहे. या लिंगाचे वैशिष्ट्य असे - या मैनगिरी पर्वताचा आकार ओंकारासारखा आहे. या ओंकारातील मुख्य मातृका हि अर्धमातृका होय. याच अर्धमातृकेवर या लिंगाची स्थापना केलीली आढळून येते. म्हणून या लिंगास (तीर्थास) ओंकार ममलेश्वर असे म्हणतात. विनायक चतुर्थी, संकष्ट चतुर्थी, गणेश चतुर्थी तसेच खास अंगारक संकष्टीस येथे भाविकांची मोठी गर्दी असते.

५ . महाकालेश्वर - नंदकेश्वर

( श्री यमाई मंदिरासमोर )

मूळ ठिकाण: उज्जैन - मध्य प्रदेश

रक्तभोजाचा वध केल्यानंतर श्री केदारनाथांनी महाकालेश्वर या लिंगाची (तीर्थाची) स्थापना केली. जोतिबा डोंगरावरील नवरात्रोत्सवात प्रत्यक दिवशी या तीर्थक्षेत्रासमोर आरती येते व षोडशोपचार विधी होतात. या नंदिकेश्वर लिंगाचे वैशिष्ट्य असे की, हे लिंग पूर्वाभिमुख आहे. या लिंगासमोर असणारा नंदी हा वैशिष्ट्यपूर्ण आहे.

६. कर्पुरेश्वर

( जोतिबा कर्पूरतीर्थाच्या काठावर )

मूळ ठिकाण: श्री घृणेश्वर-वेरूळ-औरंगाबाद

जोतिबा डोंगरावरील करपुरेश्वराचे देवालय पूर्वाभिमुख असून या ठिकाणी पूर्वी रम्य असा परिसर होता व फुलांची बाग असल्याची नोंद प्राचीन ग्रंथात आढळून येते. याच ठिकाणी आदिशक्ती चर्पट आंबा या देवीने या तीर्थाची निर्मिती केली. त्यालाच या लिंगावरून कर्पूरतीर्थ हल्ली कापूरबाव असेही म्हटले जाते. हे पवित्र तीर्थ असल्याने या ठिकाणी नवरात्रोत्सवामध्ये श्रींची धुपारती होऊन भक्तिभावाने कर्पुरेश्वराची पूजा केली जाते.

७. त्र्यंबकेश्वर

( गिरोली गावाच्या निनाई मंदिरात )

मूळ ठिकाण: नाशिक

जोतिबा डोंगराच्या पूर्वेस नील पर्वतावर पूर्वी सिंधुराज नावाचा राक्षस वास्तव्य करीत होता. हा राक्षस प्रचंड पराक्रमी व बलशाली असल्याने त्याच्या अत्याचाराने त्रस्त झालेल्या ऋषीमुनींनीं बत्तीस शिराळा या गावी मुक्कामी असणाऱ्या श्री केदारनाथला साकडे घातले. तेव्हा केदारनाथांनी आपला सेनापती कालभैरव व गंडभैरव यांची मोहिमेवर नियुक्ती केली. त्यांनी या ठिकाणी येऊन नील पर्वतावरील निनाई (निलाई) देवीच्या साहाय्याने सिंधुराज राक्षसाचा वध केला व त्या ठिकाणी विविध गावांची स्थापना केली. निनाईदेवीच्या मंदिरापुढे त्र्यंबकेश्वर लिंगाची स्थापना केली.

८. औंढ्या नागनाथ

( पोहाळे तर्फ आळते येथील पांडव लेण्यात )

मूळ ठिकाण: नागनाथ - परभणी

जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी अग्नेय दिशेस घनदाट जंगलामध्ये निर्जन अशा कड्या-कपारीमध्ये पांडवकालीन गुहेमध्ये या औंढ्या नागनाथ लिंगाची स्थापना श्री केदारनाथांनी केली. या तीर्थक्षेत्राच्या पूर्वेस जुगाई तसेच दक्षिणेकडे पोहाळे गावी संकटविमोचन मारुतीची स्थापना केली. औंढ्या नागनाथ हे तीर्थ अत्यंत जागृत मानले जाते व श्रावण महिन्यातील प्रत्यक सोमवारी दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करतात.

९. सोरटी सोमनाथ

( नरंदे ता: हातकणंगले नागनाथ दारुकवन )

मूळ ठिकाण: सौराष्ट्र, गुजराथ

वाडी रत्नागिरी डोंगरापासून पूर्वेस वीस किलोमीटरवर हातकणंगले तालुक्यातील नरंदे या गावी सोरटी सोमनाथ या लिंगाची स्थापना केदारनाथांनी केली. नरंदे या ठिकाणी दारूक वनामध्ये भक्त गोमा सावंतसाठी या नागनाथ तीर्थाची स्थापना केली गेली.

१०. परळी वैजनाथ

( सादळे - मादळे येथील सिद्धोबा टेकडी )

मूळ ठिकाण: श्री वैजनाथ - बीड

जोतिबा डोंगराच्या पूर्वेस चार किलोमीटरवर सादळे गावच्या ईशान्य बाजूच्या टेकडीवर परळी वैजनाथ या तीर्थाची स्थापना केलेली आहे. सादळे गावच्या टेकडीवर वैजनाथांची स्थापना केदारनाथांच्या विनंतीवरून केली. या टेकडीचा आकार शिवलिंगाप्रमाणे आहे. या ठिकाणी अनेक सिध्दपुरुष व ऋषींनी वास्तव्य केले आहे.

११. श्री शैल्य मल्लिकार्जुन

( जोतिबा गायमुख तलावाजवळ )

मूळ ठिकाण: कर्नुल आंध्र प्रदेश

मल्लिकार्जुन तीर्थ बारा ज्योतिर्लिंगांपैकी जागृत व जाज्वल्य असे पवित्र ठिकाण आहे. याच ठिकाणी ज्याच्यासाठी बारा ज्योतिर्लिंगांची स्थापना करण्यात आली तो गोमा सावंत यांचा उद्धार श्री केदारनाथांनी गायमुख तीर्थावर केला. याच तीर्थावर गोमा सावंतास बारा ज्योतिर्लिंगांचा साक्षात्कार झाला.

१२. भीमाशंकर

( जोतिबा डोंगर डांकीणी तीर्थाजवळ )

मूळ ठिकाण: भीमाशंकर, पुणे

श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावरील डांकीणी तीर्थाजवळ दक्खनचा राजा जोतिबा यांनी भीमाशंकर या तीर्थाची स्थापना केली. या तीर्थाच्या पश्चिम बाजूस शक्तिदेवांची ( स्रीदेवता) अनेक तीर्थक्षेत्रे आढळून येतात. या लिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे ते जागृत असे तीर्थक्षेत्र आहे. श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी नगर प्रदक्षिणा निघते.